Power Tiller
बहुपयोगी पॉवर टिलर-
पॉवर टिलरमधील रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे बारीक करणे, जुन्या पिकांचे अवशेष काढणे, चिखलणी करण्यासाठी केला जातो. यामधील अर्ध गोलाकार कुदळीसारखे फाळ हे कोरडी नांगरट, तणनियंत्रण, खोली नांगरट यासाठी वापरले जातात. कल्टीव्हेटर ही यंत्रणा फळबाग, वनशेतीमधील मशागतीसाठी उपयुक्त आहे. वेळ व मजुरांची बचत तसेच पशुशक्तीला पर्याय म्हणून शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलर हे यंत्र विकसित करण्यात आले आहे. या यंत्राद्वारे कोरडी नांगरणी, चिखलणी, मशागत व अंतर्गत मशागत, पाण्याचा पंप चालवण्यापासून ते कीडनाशक फवारणीची कामे करता येतात. याचबरोबरीने वाहतूक, भात भरडणी, उसाचे चरक चालवणे ही सर्व कामे करणे देखील शक्य आहे.
पॉवर टिलरचे मुख्य भाग ः १) इंजीन,२) शक्ती संचारना यंत्रणा,३) ब्रेक आणि स्टिअरिंग प्रणाली,४) गती नियंत्रणाची व्यवस्था ५) ट्रॅशनची चाके इ. रोटाव्हेटर ः १) रोटोव्हेटर हे पॉवर टिलरचे मुख्य अवजार आहे. रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे बारीक करणे, जुन्या पिकांचे अवशेष काढणे, चिखलणी करण्यासाठी केला जातो. २) यामध्ये १२ ते २२ या संख्येत फाळ जोडण्याची सोय केलेली असते. यामधील अर्ध गोलाकार कुदळीसारखे असणारे फाळ हे कोरडी नांगरट, तणनियंत्रण, खोली नांगरटीसाठी वापरले जातात. विळ्याच्या आकाराचे फाळ तसेच तोंडाला वक्रता असणारे चपटे फाळ चिखलणीसाठी वापरले जातात. ३) कल्टीव्हेटर ही यंत्रणा फळबाग, वनशेतीमधील मशागतीसाठी उपयुक्त आहे. पॉवर टिलरमुळे आंतरमशागतीची कामे वेळेत पूर्ण होतात.
पॉवर टिलरचे व्यवस्थापन ः १) इंजीन व एअर क्लिनरमधील तेलाची पातळी वेळेवर तपासावी. ती कमी असल्यास बरोबर करून घ्यावी. २) इंजीन फाउंडेशन व चॅसिचे नट-बोल्ट घट्ट बसवावेत. चाक व दातांचे नट बोल्ट घट्ट बसवावेत. ३) चाकामधील हवेचा दाब वेळोवेळी तपासावा. प्रमाणित दाबाइतकी चाकामध्ये हवा भरावी. ४) पॉवर टिलरच्या व्ही बेल्टचा ताण तपासून घ्यावा. बेल्टच्या मध्यभागी दाबल्यानंतर १२ मि.मी. पेक्षा जास्त दाबला जाणार नाही, अशा प्रकारे बेल्ट घट्ट करावा. ५) गिअर बॉक्स, रोटरी चेनमधील तेलाची पातळी तपासावी, तसेच नियमितपणे ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर आणि इंजीन ऑइल बदलावे. ६) इंजिनमध्ये थंडीच्या दिवसांत एस.ए.ई. ३० व उन्हाळ्यात एस.ए.ई. ४० प्रतीचे वंगण तेल वापरावे. ७) गिअर बॉक्समध्ये एस.ए.ई. ९० प्रतीचे तेल वापरावे. हे तेल १५० तासांनंतर बदलावे. ८) वेळोवेळी क्लच-शाफ्ट, क्लच रॉड, टेलव्हिल बुश, ऍक्सिलेटर केबल यांना तेल द्यावे. ९) रोटाव्हेटर शाफ्टच्या ग्रीस कपमधील ग्रीस दर २५ तासांच्या कामानंतर बदलावे.
पॉवर टिलर चालवताना घ्यावयाची काळजी ः १) पॉवर टिलर विकत घेतल्यानंतर सोबत मिळणारी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. सर्व भाग व प्रणालींची माहिती करून घ्यावी. २) शेतात वापरण्यापूर्वी यंत्राचे काही भाग ढिले झाले असल्यास ते घट्ट आवळावेत. तसेच झिजलेले, तुटलेले भाग बदलावेत. ३) पॉवर टिलर चालविण्यापूर्वी सर्व शील्ड व गार्ड नीटपणे बसविल्याची खात्री करावी. ४) शेतात वापरापूर्वी पॉवर टिलरच्या टाकीमध्ये इंधन भरावे. इंजीन थंड असतानाच इंधन भरावे. ५) पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू अवस्थेत आहे, याची खात्री करूनच चालू करावा म्हणजे अपघात होणार नाही. ६) पॉवर टिलर चालविताना फिरणाऱ्या भागांपासून हात व पाय यांचा बचाव करावा. विशेषतः रोटाव्हेटर जोडला असताना पाय रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यांमध्ये अडकणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ७) जमीन ओली असेल, तर पॉवर टिलर चालवू नये. काम करीत असताना मध्येच अडथळा आल्यास पॉवर टिलर त्वरित बंद करावा. ८) पॉवर टिलर चालू स्थितीत सोडून जाऊ नये. पॉवर टिलर वळविताना किंवा वाहतूक करताना ट्रान्समिशनमुक्त करावे. ९) पॉवर टिलरवर काम करीत असताना अंगावर सैल कपडे वापरू नयेत. तसेच तोंडावर व डोक्यावर चांगल्या कपड्याने गुंडाळून घ्यावे. १०) प्रत्येकवेळी नांगरट किंवा इतर कामे झाल्यानंतर चेस, गिअरबॉक्स, रोटोव्हेटर यांचे नटबोल्ट घट्ट करून घ्यावेत. ११) नांगरटीच्या वेळी खोली नियंत्रित करणारे चाक जुळवून योग्य खोली नियंत्रित करावी. १२) बांधावरून अथवा घसरत्या रानात चढ-उतार करताना रोटोव्हेटर बंद करावा. १३) रोटोव्हेटरमधील गवत, कचरा, पिकांचे राहिलेले अवशेष काढताना पॉवर टिलरचे इंजीन पूर्णपणे बंद ठेवावे.
पॉवर टिलरचे फायदे ः
१) पॉवर टिलरला रोटाव्हेटर जोडून जमीन भुसभुशीत करता येते.
२) एकाचवेळी नांगरणी आणि ढेकळे फोडणे ही दोन्ही कामे होतात, त्यामुळे ढेकळे फोडण्यासाठी जमिनीला स्वतंत्रपणे कुळवाच्या पाळ्या घालण्याची आवश्यकता राहत नाही.
३) फळबागांमध्ये आंतरमशागत करताना दहा ते १५ सें.मी. खोलीपर्यंत तण समूळ काढले जाते. याद्वारे ९५ टक्के क्षेत्रांतील तणनिर्मूलन करता येते. तसेच फळझाडांच्या खालून व्यवस्थितपणे काम करता येत असल्याने झाडांच्या फांद्या मोडत नाहीत.
४) भातशेतीमध्ये रोटाव्हेटरच्या साहाय्याने चिखलणीचे काम सुलभरीत्या व प्रभावीपणे करता येते.
५) पॉवर टिलरचलित बहुपीक टोकण यंत्राचा वापर करून भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, तूर, हरभरा, ज्वारी, गहू इत्यादी पिकांची टोकण करता येते.
६) वनशेतीमध्ये झाडे लावण्यासाठी तसेच फळझाडांच्या लागवडीसाठी खड्डे घेण्याचे काम पॉवर टिलरने करता येते. हे खड्डे खोदण्याचे यंत्र पॉवर टिलरच्या पुढील बाजूस जोडता येते. या यंत्राद्वारे ३० सें.मी. व्यास व ४५ सें.मी. खोलीचे खड्डे खोदता येतात.
७) ट्रॅक्टरप्रमाणे पॉवर टिलरला ट्रॉली जोडून शेतीमालाची वाहतूक करता येते.
८) पॉवर टिलरच्या मागील बाजूस भात मळणीयंत्र जोडून वापरता येते.
९) फळबाग तसेच वनशेतीमध्ये आंतरमशागतीसाठी पाच दातांचा कल्टिव्हेटर उपलब्ध आहे. कल्टिव्हेटरच्या साहाय्याने १५ सें.मी. खोलीपर्यंत मशागतीची खोली कमी-जास्त करता येते. एका दिवसात १ ते १.२५ हेक्टर क्षेत्रावर आंतरमशागत शक्य होते.
१०) पाणी उपसण्याचा पंप, कडबा कटर, पिठाची गिरणी, गवत कापण्याचे यंत्र, जनरेटर इत्यादींचा वापर पॉवर टिलरच्या साहाय्याने करता येतो.
Comments
Leave a comment